टू बी ऑर नॉट टू बी.........

किती रम्य, सुखदायी काळ चालला होता ना!
काय झालं? होत्याचं नव्हतं झालं! जे स्वप्नात देखील नव्हते ते आज प्रत्यक्षात सामोरं आलं आहे.घरातल्या घरात करणार तरी काय?
सातत्यानं टि. व्ही.वरील बातम्या मन:शांतीची
कसोटी पाहत आहेत.
किती वाढले?
किती मृत्युमुखी पडले?
अगदी नाही म्हटलं तरी मनातील चिंता ,भीती
कशी लपवावी?
माझ्यासारखे अनेक लोक घाबरून आहेत.
मन रमेल असं काहीच काम सुचत नाही. चित्रपट बघावासा वाटत नाही,वाचनाची 
आवड असून वाचन सुचत नाही.
मती कुंठित झालीय.
सतत धावपळ सुरू होती,तेव्हा आराम मिळत नव्हता.आता सक्तीची विश्रांती.............
"मुद्दतों से आरजू थी जिस फुरसत की
वो मीली भी तो इस शर्त पर के
किसी से ना मीलो ............."
ही शांतता,विश्रांती जीवघेणी आहे, दीर्घकालीन
भयाण....................
 आपले कुटुंबीय,जिवलग मित्र मंडळ सर्व सुखरूप आहेत.घरात जीव रमव सांगणं सोप्पं असतं पण सोसण अवघड. दार बंद करून सीमित झालेलं जग . खिडकीतून दिसणारे आकाश हेच माझं अवकाश आहे.
खाली रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारस,भटक्या कुत्र्यांची केविलवाणी अवस्था झाली आहे.त्यांची उपासमार झालीय, पोटे खपाटीला गेलेली दिसताहेत.रोज रोज दिसणारी माणसे गेली कुठे? हा प्रश्न त्यांनाही पडलाय.आतापर्यंत
हॉटेल,छोट्या- मोठ्या टपऱ्या,खाऊच्या गाड्या, मासळीबाजाराच्या आसपास कोठेही पोट भरत असे. त्यांच्यासाठी घासातला घास देऊ.आज आपली त्यांना गरज आहे.
काय करायचं या पशुपक्षांनी ? माणसाच्या आसऱ्याने राहत आहेत.आताचा बदल बहुतेक त्यांच्याही लक्षात आला आहे,त्यांनीही जुळवून घेतलं आहे.
गावाकडे निघालेले जथ्थे पाहून तर गलबलून आलं.कोणाला कशी ख्यालखुशाली विचारावी?
कोण कुठे चाललाय?
आता एकमेकांना साद घालायची,मदतीचा हात पुढे करायचा.हीच वेळ आहे कसोटीची ,
काळ आपली परीक्षा घेणार आहे.संसर्गाचा धोका कसा टाळावा,हे पुन्हा पुन्हा समजावणे,त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी सकारात्मक विचार मांडणे .यासाठी कंबर कसली पाहिजे.या महामारीशी दोन हात करू,तिला हरवू आणि नक्कीच आपण जिंकू
जगावं की मरावं हा प्रश्नच निर्माण होत नाही.
बचेंगे तो और भी लडेंगे l